maharashtra

भुडकेवाडी येथे घरफोडी करून ४१ हजार रुपयांचे साहित्य लंपास; रोख रक्कमही लांबवली

दहा दिवस झाले तरी पंचनामा करण्यास तारळे पोलिसांची टाळाटाळ

संजीव पांडुरंग मोरे आणि बाबुराव पांडुरंग मोरे या दोन बंधूंनी भुडकेवाडी (वरची), ता. पाटण येथे सोनाई निवास नावाचे घर बांधले आहे. यातील संजीव मोरे हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्य करतात तर बाबुराव मोरे सातारा येथे वास्तव्य करतात.

सातारा : भुडकेवाडी (वरची), ता. पाटण येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार रुपयांचे साहित्य व १० हजार रुपये चोरून नेले आहे. या घटनेची नोंद तारळे पोलीस ठाण्यात झाली असून दिलेल्या तक्रारीची प्रत देण्यास पोलीस नकार देत आहेत. एवढ्यावरच तारळे पोलिसांचा प्रताप थांबला नाहीतर चोरीच्या घटनेला दहा दिवस उलटूनही त्यांनी अद्याप पंचनामाच केला नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संजीव पांडुरंग मोरे आणि बाबुराव पांडुरंग मोरे या दोन बंधूंनी भुडकेवाडी (वरची), ता. पाटण येथे सोनाई निवास नावाचे घर बांधले आहे. यातील संजीव मोरे हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्य करतात तर बाबुराव मोरे सातारा येथे वास्तव्य करतात. दि. ४ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भुडकेवाडी (वरची) येथील घरात घरफोडी करून आतील १४ हजार रुपये किमतीचा फ्रिज, ५ हजार रुपये किमतीचा सिलेंडर,१० हजार रुपये किमतीची नवीन भांडी, १२ हजार रुपये किमतीची सोयाबीनची दोन भरलेली पोती, आणि १० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. या घटनेची माहिती मिळताच मोरे बंधू घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ते तारळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता आता मला काम आहे, दोन दिवसांनी येतो असे उत्तर पोलिसांनी दिले. दोन दिवसांनी पोलिसांनी जाऊन पाहणी केली. यावेळी मोरे बंधुंनी काय काय चोरून नेले, याची माहिती दिली. मात्र घटनास्थळाचा पंचनामा न करता पोलीस आल्यापावली माघार गेले. चोरीच्या घटनेला १० दिवस उलटून गेले तरी तारळे पोलीस अद्याप पंचनामा करण्यासाठी फिरकले नाहीत. एवढेच नव्हे तर दिलेल्या तक्रारीची प्रत देण्यासाठी पोलीस नकार देत आहेत.

एस.पी. साहेब, तुम्ही लक्ष घालाच !
जिल्ह्यामध्ये काही पोलीस अत्यंत उत्कृष्ट काम करीत असताना या घटनेच्या निमित्ताने तारळे पोलिसांचा बेफिकीरपणा उघड होत आहे. तक्रारीची दखल न घेणे, पंचनामा न करणे असे प्रताप पोलीस करणार असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? समीर शेख यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केली आहे. त्यांच्या कामगीरीला गालबोट लावण्याचे काम अशा प्रवृत्तीकडून होत आहे. त्यामुळे एस.पी. समीर शेख यांनी या घटनेत लक्ष घालावे, असे सूर उमटत आहेत.