maharashtra

मेढ्यातील खुनाची केवळ बारा तासांच्या आत उकल

दोघे संशयित जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मेढा, ता. जावली येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या खुनाची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केवळ बारा तासात केली आहे. याप्रकरणी दोघा जणांना जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.

सातारा : मेढा, ता. जावली येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या खुनाची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केवळ बारा तासात केली आहे. याप्रकरणी दोघा जणांना जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.
अक्षय सोमनाथ साखरे वय 22, रा. गांधीनगर, मेढा आणि परमेश्वर गणपत पवार वय 26, रा. आंबेडकर नगर, मेढा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी पहाटे च्या सुमारास मेढा तालुका जावली गावच्या हद्दीत राम बाबू पवार वय 36, रा. गांधीनगर, मेढा, ता. जावली यांचा कोणीतरी अज्ञातांनी डोक्यात सिमेंटच्या ओबडधोबड दगडाने आणि लाकडी फळीने मारहाण करून खून केला असल्याची फिर्याद मेढा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी वाई च्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे हे पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळावर आल्यानंतर या अधिकाऱ्यांसह संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांनी घटनास्थळाजवळील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडे विचारपूस केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता फुटेज मध्ये गुन्हा घडला त्यावेळी पिवळ्या व काळ्या रंगाचे जर्किन घातलेले दोन संशयित आढळून आले.
यानंतर पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र तपास पथके तयार करून त्यांना फुटेज मधील संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
फुटेज मधील संशयतांचा तपास पथके शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या तपास पथकास हे संशयित मेढा शहरात सापडले त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्यांच्याकडे संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केले असता त्यांनी मृत रामबाबू पवार हा एकाच्या वडिलांना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्रास देत असल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सांगितले अशा रीतीने गंभीर खुनाचा गुन्हा केवळ बारा तासांच्या आत उघडकीस आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, सुधीर बनकर, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, मुनीर मुल्ला, मोहन पवार, प्रवीण कांबळे, अजित करणे, गणेश कापरे, विशाल पवार, मोहसीन मोमीन, वैभव सावंत, सचिन ससाणे, शिवाजी गुरव, पंकज बेसके, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, यशोमती काकडे, यशवंत घाडगे, निखिल घाडगे यांनी केली आहे. कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.