maharashtra

जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीचा आरोग्य उपसंचालकांनी घेतला राऊंड

विविध वार्डांना दिली भेट; प्रशासकीय कामकाजाच्या दिल्या सूचना

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या 15 वार्डसह बाह्य रुग्ण विभागाचा आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी राऊंड घेतला. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांना काय सुविधा मिळतात, याची त्यांनी माहिती घेतली. राऊंड नंतर झालेल्या आढावा बैठकीतही प्रशासकीय कामकाजाच्या त्यांनी सविस्तर सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केल्या.

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या 15 वार्डसह बाह्य रुग्ण विभागाचा आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी राऊंड घेतला. यावेळी रुग्णांशी चर्चा करून त्यांना काय सुविधा मिळतात, याची त्यांनी माहिती घेतली. राऊंड नंतर झालेल्या आढावा बैठकीतही प्रशासकीय कामकाजाच्या त्यांनी सविस्तर सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केल्या.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या एकूणच कामकाजाची डॉक्टर पवार यांनी पाहणी केली. तत्कालीन काळात डॉक्टर पवार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेत काम केले आहे. आरोग्य उपसंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची ही जिल्हा रुग्णालयाची तिसरी भेट होती. जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्णविभागात त्यांनी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्या समावेत वॉर्डचा राऊंड घेतला. तसेच आयुष विभाग, प्रसुती कक्ष, सिटीस्कॅन यंत्रणा, राष्ट्रीय तंबाखू निवारण कार्यक्रम एनएसडीसी अशा विविध उपक्रमांची सुद्धा त्यांनी माहिती घेतली. डॉक्टर पवार यांनी रुग्णांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रुग्णालयात काय सुविधा मिळतात, याचीही सविस्तरपणे माहिती घेतली.
सातारा जिल्हा रुग्णालयासाठी भुयारी गटार योजनेसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्याची निविदा निघाली आहे. या प्रक्रियेची सुद्धा डॉक्टर पवार यांनी माहिती घेऊन या संदर्भात प्रशासकीय कामकाजाच्या सविस्तर सूचना केल्या. तसेच रुग्णालयातील इतर अडचणी विशेषत: वैद्यकीय अधिकारी वर्ग एक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अतिरिक्त मनुष्यबळाच्या संदर्भात त्यांच्याशी संपर्क केला असता राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, आवश्यक पदांच्या भरती प्रक्रियेची मोहीम पुढील महिन्यात राबवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनुष्यबळाचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.