कराडसह तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी
बाल मावळ्यांमध्ये उत्साह : शहरात शिवपुतळ्यावर आकर्षक रोषणाई
कराड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, नागरिकांना शिवजयंती उत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु, यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने लोकांमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून आला.
कराड : कराड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, नागरिकांना शिवजयंती उत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु, यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने लोकांमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून आला. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी केल्याचे दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी; जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
येथील दत्त चौकातील शिवतीर्थावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वाहरुढ पुतळा परिसरात नगरपालिकेकडून आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी दत्त चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, तहसीलदार विजय पवार, माजी नगरसेवक अल्ताफ शिकलगार व त्यांचे सहकारी, शिवसेनेचे रामभाऊ रैनाक, राजेंद्र माने, शशिकांत हापसे व कार्यकर्ते, भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रशांत कुलकर्णी व कार्यकर्ते, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, मा. नगरसेवक इंद्रजीत गुजर, इंद्रजीत चव्हाण, लोकशाही आघाडीचे सुभाष पाटील, मा. नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, गंगाधर जाधव, दादा शिंगण, संभाजी सुर्वे, शिवाजी पवार, अख्तर आंबेकरी, सादिक इनामदार, जयंत बेडेकर तसेच पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.
शहरातील दत्त चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसर रंगबेरंगी फुलांच्या माळांनी सजवण्यात आला होता. शनिवारी सकाळपासून शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यानी व नागरिकांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कराड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये व वाड्यावस्त्यांमध्ये ठिकठिकाणी सार्वजनीक मंडळांकडून शिवपुतळ्याची व शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना करुन शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक मंडळांनी विविध गड किल्ल्यावरुन शिवज्योती आणल्या होत्या. यावेळी शिवमावळ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवजयंती मंडळांनी शिवाजी महाराजांचे पोवाडे गाण्याच्या ध्वनीफिती लावून संपूर्ण वातावरण शिवमय केले होते. कराड शहरात दुचाकी वाहनांना भगवे झेंडे लावून फिरणारे अनेक तरुण दिसून आले. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्ष शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, नागरिकांना शिवजयंती उत्सव साजरा करता आला नव्हता. यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने विविध निर्बंध शिथिल केले. त्यामुळे सर्वत्र शिवजयंती उत्सवाचा आनंद पाहायला मिळाला.


